वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचे माजी फलंदाज जॉन एफ. रीड यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. डावखुरे फलंदाज असलेल्या रीड यांनी 1979 ते 1986 या कालावधीत 19 कसोटी व 25 वनडे सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते.
रीड यांनी कसोटीत 46.28 च्या सरासरीने 1296 तर वनडेत 633 धावा जमविल्या होत्या. कसोटीत त्यांनी 6 शतके व 2 अर्धशतके नोंदवली होती. 1985 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध गब्बा मैदानावर नोंदवलेली 108 धावांची शतकी खेळी संस्मरणीय ठरली होती. न्यूझीलंडने त्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर डावाने विजय मिळविण्याचा पराक्रम केला होता. त्यांनी मार्टिन क्रोसमवेत तिसऱया गडय़ासाठी 224 धावांची न्यूझीलंडतर्फे विक्रमी भागीदारी केली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 101 सामन्यांत 5650 धावा जमविल्या. 1975 ते 1988 या कालावधीत ऑकलंडतर्फे खेळताना त्यांनी यष्टिरक्षणही केले होते. निवृत्तीनंतर त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक आणि हाय परफॉर्मन्स मॅनेजर म्हणून काम पाहिले होते.