वार्ताहर / शिये
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी म्हैस दूध दराच्या फॅट मधील प्रति पॉईंट दहा पैशाची वाढ करून चाळीस पैसे प्रति पॉईंट दरपत्रक करावे. अशी मागणी हनुमान सहकारी दूध संस्थेचे लाटवडेचे चेअरमन अॅड. शहाजी पाटील यांनी केली आहे .
कोल्हापूर जिल्हा सहकारी गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रात प्रथम , देशात तिसरा व जगात १४ वा क्रमांक असलेला संघ आहे. या संघाने कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे .सुरुवातीच्या काळात गाय आणि म्हैस यामध्ये दहा पैशाचा दरामध्ये नेहमी फरक असायचा. यामुळे म्हैस दूध गाय दुधापेक्षा जास्त होते. मधल्या काळात संघाने गाय आणि म्हैस दुधाचा प्रति पॉईंट दर तीस पैसे निश्चित केला आहे. यामुळे जिल्ह्यात म्हैस दुधाचे संकलन कमी होऊन गाय दुधाचे संकलन मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. परिणामी सध्या सुमारे १५ लाख लिटर दूध संकलन असुनही मागणीप्रमाणे म्हैस दुधाचा पुरवठा करताना संघाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हैस दुधासाठी करावे लागणारे संगोपण, त्यांचा दैनंदिन पशुखाद्य व आहाराचा खर्च , कष्ट तसेच भाकड काळ या सर्वांचा विचार करता म्हैस दूध दरांमध्ये प्रति पॉईंट दहा पैशाची वाढ करणे काळाची गरज बनली आहे. ही दरवाढ न केल्यास म्हैस संगोपन कमी होऊन पुन्हा गाईचे संगोपन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .
तरी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने गाय आणि म्हैस दुधाच्या दारातील समानता कमी करून म्हैस दुधाच्या दरात प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करून म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.