प्रतिनिधी/ बेंगळूर
रक्तशर्करा खालावल्याने प्रकृती बिघडल्याने केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांना रविवारी बेंगळुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. शिमोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकारिणी सभेत सहभागी होऊन ते पुन्हा बेंगळूरला परतत असताना त्यांची तब्येत खालावली आहे.
दरम्यान, चित्रदुर्गच्या हॉटेल रेजन्सीमध्ये दुपारच्या जेवणासाठी कारमधून उतरत असताना ते अचानक अस्वस्थ झाले. त्यांना तात्काळ चित्रदुर्ग येथील बसवेश्वर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रक्तशर्करा खालावल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या उपचारानंतर काहीकाळ विश्रांती घेतल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून बेंगळूरच्या अस्टर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालयाचे डॉ. बृंदा यांनी सांगितले आहे. मंत्री सदानंदगौडा यांना इतर कोणताच त्रास नाही. केवळ रक्तशर्करा खालावल्याने ते अस्वस्थ झाले होते, असेही डॉक्टर म्हणाले.