प्रतिनिधी / घुणकी
हातकणंगले येथे पहाटे दोन गव्यांनी दर्शन दिल्याने किणी, घुणकी, वाठार, तळसंदे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरी ऐल किणी येथे अजित नेमगोंडा पाटील यांची घरामागील बाजूस जुन्या हायवेलगत रिकामी जागा आहे. इथे चिंचेच झाड व शेजारी छोटा आड आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दोन गवे नवीन व जुना हायवे पार करून किसान पाणी पुरवठ्यानजीकच्या ऊस शेतीतून आले.
दरम्यान किणी येथील संजय चाळके हे पुण्याहून गावी परत आले असताना त्यांच्या मोटारी समोरुन दोन्ही गवे अजित पाटील यांच्या जागेत गेले. एखाद्या शेतकऱ्यांची जनावरे असावीत या भावनेतून श्री. चाळके यांनी शेजारच्या नागरिकांना माहिती दिली. पण ते गवे असल्याचे निदर्शनास आले. चिंचेच्या झाडाखाली काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ज्या मार्गाने गवे आले त्याच मार्गाने ऊस तोडणी झालेल्या शेतातून तळसंदे गावच्या दिशेने गेल्याचे नागरीकांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली असुन त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
नरंदे वनविभागाचे वनरक्षक ईश्वर जाधव, वनसेवक पी.एन.खाडे यांनी पाहणी केली.गव्यांचा भ्रमण काळ असल्याने ते एका ठिकाणी थांबत नाही. शेतकऱ्यांनी शेतात जाताना दोनहून अधिक शेतकऱ्यांनी काठी आणि रात्री बॅटरी घेऊन जावे. गवे निघून जातात. त्यांना हुसकावून लावू नये.ते बिथरण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.