वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग
जर्मनीचा टॉप सीडेड पुरूष टेनिसपटू अलेक्झांडर व्हेरेव्हने 2021 च्या टेनिस हंगामासाठी आपले प्रशिक्षक तसेच स्पेनचा माजी टेनिसपटू डेव्हिड फेररपासून फारकत घेतली आहे.
2020 च्या मध्यंतरी स्पेनचा माजी टेनिसपटू डेव्हिड फेररचे जर्मनीच्या टेनिस संघाला मार्गदर्शन लाभले होते. तो या संघाचा प्रमुख प्रशिक्षक होता. जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हलाही डेव्हिड फेररचे मार्गदर्शन लाभले होते. पण आगामी टेनिस हंगामासाठी डेव्हिड फेरर व्हेरेव्हचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहणार नाही, असे व्हेरेव्हने आपल्या ट्विरवर ही माहिती दिली. फेररच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीच्या व्हेरेव्हने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होते पण त्याला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्हेरेव्हने कोलॉन येथील एटीपी टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या. डेव्हिड फेररने व्हेरेव्हला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 2021 च्या टेनिस हंगामाला ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न पार्कवर होणाऱया एटीपी टूरवरील स्पर्धेने व्हेरेव्ह प्रारंभ करणार आहे.