प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक रविवारी सायंकाळी जत्तीमठ येथे पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पुढील दोन वर्षांकरिता युवा समितीच्या अध्यक्षपदी शुभम शेळके यांची फेरनिवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी पुढील बैठकीत निवडण्यात येणार असून, पद सांभाळण्यास जे इच्छुक आहेत त्यांनी पुढील 10 दिवसात अध्यक्षांकडे अर्ज आणि सूचना सोपवाव्यात, असा ठराव मंजूर करण्यात आला.
येत्या 17 जानेवारीला होणाऱया हुतात्मा दिनाला उपस्थित राहून हा दिवस गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच 21 जानेवारी रोजीच्या अनधिकृत झेंडय़ासंबंधी विराट मोर्चाला मराठी भाषिकांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठय़ा संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी मराठी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या बैठकीला धनंजय पाटील, श्रीकांत कदम, साईनाथ शिरोडकर, मनोहर हुंदरे, चंद्रकांत पाटील, सूरज कुडुचकर, विनायक कावळे, सचिन केळवेकर, किरण हुद्दार, किरण मोदगेकर, रोहित गोमाण्णाचे, अश्वजीत चौधरी, शिवाजी मेणसे, रोहन लंगरकांडे, अमित देसाई, शांताराम होसुरकर, प्रवीण कोरणे, अजय सुतार, विशाल गौंडाडकर यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते..