कोरोना लसिकरणाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता
प्रतिनिधी/ चिपळूण
तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा पोलिओ लसीकरण मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. याचे कारण अस्पष्ट असले तरी कोरोनाच्या लसीकरणामुळे शासनाने हा निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे. ही लस बालकांसाठी महत्वाची आहे.
सशक्त भावी पिढी घडवण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील मुलांना हा डोस दिला जात असून त्याचा मोठा फायदा होत आहे. पूर्वी वर्षातून दोनवेळा तर गेल्या तीन वर्षापासून वर्षातून एकदाच हा डोस दिला जात आहे. ही मोहीम मोठय़ा प्रमाणात राबवली जाते. ती राबवण्यापूर्वी यात सहभागी होणाऱया कर्मचाऱयांना प्रशिक्षण दिले जाते. जानेवारी महिन्याच्या 17 तारखेला मोहीम राबवल्यानंतर डोस न घेतलेल्या मुलांना घरी जाऊन डोस देण्याची प्रक्रिया शासन राबवते. यावर्षीही 17 जानेवारीला ही मोहीम राबवली जाणार होती. मात्र अचानकपणे शासनाने ती रद्द केली आहे.
पोलिओ लसिकरण पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नसून ही मोहीम आता मार्च – एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाची लस देण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असून त्याची सुरूवातही 16 जानेवारीपासून होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंत्रणेवर एकाचवेळी या दोन लसिकरण मोहिमांचा ताण येऊ नये किंवा कोरोनाची लस बनवण्यात कंपन्या व्यस्त असल्याने कदाचित पोलिओची लस पुरेशी उपलब्ध नसल्याने ही मोहीम पुढे नेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ वर्षापूर्वीही काही कारणास्तव ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.