प्रतिनिधी / बेळगाव
उडान योजनेला बेळगावच्या जनतेने प्रतिसाद दर्शविला आहे. बेळगावकरांच्या सहकार्यामुळेच देशातील 52 छोटय़ा शहरांमधील विमानतळात बेळगाव अग्रस्थानी असल्याचे मत बेळगाव सांबरा विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी व्यक्त केले. भारतनगर शहापूर येथील वेदांत सोसायटीच्यावतीने राजेशकुमार मौर्य यांनी कोरोनाकाळात बजावलेली सेवा तसेच बेळगाव विमानतळाच्या प्रगतीसंदर्भात केलेल्या कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हभप शंकर बाबली महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नूकर यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन राजेशकुमार मौर्य व शंकर बाबली महाराज यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व अतिथींचा परिचय करून देण्यात आला. जयवंत खन्नूकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कृष्णा सायनेकर, व्हा. चेअरमन रमाकांत कारेकर, अमर चिल्लाळ, संदीप खन्नूकर यांनी विचार व्यक्त केले. यावेळी ऍड. सागर खन्नूकर, ज्ञानेश्वर सायनेकर, राहुल एडके, जयकुमार पाटील, डॉ. संपत पाटील, ऍड. सोमनाथ धामण्णावर, बाबासाहेब भेकणे, संचालिका सरिता होसुरकर, प्रकाश सुळेभावी, रामकृष्ण बाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.