वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारात जानेवारी महिन्यात अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ सादर करण्याची तयारी चालवली आहे. अर्धा डझन इतक्मया कंपन्यांचे आयपीओ बाजारात सादर होणार असल्याचे सांगण्यात येते. या आयपीओच्या माध्यमातून 8000 कोटी रुपये उभे केले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 2021 नव्या वर्षातील पहिला इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा आयपीओ सोमवारी बाजारात दाखल झाला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडिगो पेंट्स, फर्स्ट फायनान्स कंपनी आणि सूर्योदय फायनान्स बँक या कंपन्यांचे आयपीओ या महिन्यात सादर केले जाणार आहेत. होम फर्स्ट फायनान्स यांनी आयपीओकरता बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. कंपनीला आपला आयपीओ खरेतर मार्चमध्ये सादर करायचा होता. कोरोनामुळे कंपनीने सादरीकरण पुढे ढकलले आणि आता या महिन्यात आयपीओ सादर केला जाणार आहे. परदेशी गुंतवणूकदारही सध्या शेअर बाजाराकडे आकर्षित होताना दिसत आहेत. त्यामुळे हीच योग्य संधी साधून अनेक कंपन्यांनी आयपीओ आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडे सादर करण्यात आलेल्या आयपीओंना गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. अलीकडे आलेल्या अँटोनी वेस्ट हँडलींग ही इशु किंमतीपेक्षा 36 टक्के अधिक लिस्टेड झाली होती.