मैत्रिणींनो, न्याहरीला पोहे, उपमा, शिरा, इडलीव्यतिरिक्त काय करावं, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का, काहीतरी पौष्टिक पण चविष्ट असं काहीतरी हवं असतं का, मग तुम्ही मूगलेट करून बघा. हे मूगलेट म्हणजे मूगाचा चीला. हा पौष्टिक असा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल.
साहित्य : एक कप मूग, आल्याचा छोटा तुकडा, दोन हिरव्या मिरच्या, सात ते आठ कढीपत्त्याची पानं, पाव चमचा मिरपूड, थोडे जिरे आणि धनेपूड, दोन चमचे ओलं खोबरं, मीठ आणि तूप
स्टफिंगसाठी : दोन बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेली कोथिंबिर, किसलेलं पनीर, मीठ आणि लाल तिखट
कृती : मूग रात्रभर भिजवून सकाळी वाटून घ्या. वाटताना त्यात दोन हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, अर्धा कप पाणी, कढीपत्ते, मीठ घाला. वाटण तयार झाल्यावर यात कोरडे मसाले तसंच खोबरं घालून मिसळून घ्या. आता गॅसवर तवा ठेवा. त्यावर थोडं तेल घाला. तव्यावर मूगाचं पिठ घालून डोश्यासारखा गोल आकार द्या. फार पातळ करू करू नका. आवडत असल्यास थोडं जाडसरच ठेवा. त्यावर पनीरचं सारण पसरा. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. गरमागरम खा. हे मूगलेट सॉस किंवा चटणीसोबत मस्त लागेल.