प्रतिनिधी / पणजी
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे मतदारसंघातील बहुतांश सरकारी कार्यक्रमास उपस्थित राहात नसल्याने सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. मनपातर्फे शुक्रवारी आयोजित बायोडायजेस्टर प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासही ते उपस्थित राहिले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमास स्थानिक आमदार या नात्याने मोन्सेरात यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नावही छापण्यात आले होते. परंतु ते फिरकलेच नाहीत. त्यामुळे उपस्थितांमध्ये तशी चर्चा सुरू होती.
गेल्या कित्येक महिन्यांपासून श्री. मोन्सेरात सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. पणजी मनपातर्फेच हल्लीच्या काळात कितीतरी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पणजीचे लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर मोन्सेरात यांचे नावही छापण्यात येते. परंतु प्रत्यक्षात बाबूश तेथे उपस्थित राहात नाहीत, असे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री एखाद्या कार्यक्रमास जातात तेव्हा स्थानिक आमदारास तेथे मानाचे स्थान असते. स्थानिक आमदारांनेच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे हे त्याचे कर्तव्य असते. तसेच तो शिष्टाचाराचा एक भाग असतो. परंतु पणजीत स्थानिक आमदाराला मान दिल्यानंतरही हा मान ते का स्वीकारत नाहीत?किंवा त्यांना हा शिष्टाचार मान्य नाही का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
प्रत्यक्षात आमदाराची अनुपस्थिती हा त्या मतदारसंघातील जनतेचा उपमर्द ठरू शकतो. त्याचे भान ठेवत स्थानिक आमदाराने कार्यक्रमास उपस्थित राहणे हे त्याचे कर्तव्य ठरते. मात्र बाबूश मोन्सेरात यांच्या या बहिष्काराचे गुपित अनाकलनीय व पणजीकरांना कोडय़ात टाकणारे ठरत आहे.