उन्हाळ्याच्या दिवसांत घोळणा फुटण्याचे प्रकार अधिक घडतात. नाकाला धक्का लागला, सर्दीने नाकातील त्वचेला इजा झाली तर घोळणा फूटू शकतो. रक्ताची गुठळी न बनण्याच्या आजारातही घोळणा फूटू शकतो.
- मोठय़ा माणसात वाढलेला रक्तदाब हे घोळणा फुटण्याचे मुख्य कारण असू शकते.
- एखाद्याचा घोळणा फुटला तर पाहणार्यांनी घाबरून जाऊ नये. नाकातून रक्त वाहताना पाहणे जेवढे भयावह असते, तेवढा तो आजार गंभीर नाही. त्यामुळे न घाबरता रूग्णाला विश्वास देत उपचार करा.
- रुग्णाला पाठीवर झोपवू नका किंवा त्यावे डोके मागच्या बाजूला कलते करू नका. कारण वाहणारे रक्त घशातून पोटात किंवा फुफ्फुसात जाणे धोकादायक ठरू शकते.
- रुग्णाला खाली बसवा. त्याचे डोके थोडे पुढच्या बाजूस कलते राहील असे पाहा. म्हणजे रक्त बाहेर वाहून जाईल. हा रक्तस्त्राव नाकातून होत असल्यास बसलेल्या स्थितीत रक्तदाब थांबण्याची शक्यता अधिक असते.
- एकाच नाकपुडीतून रक्तस्त्राव होत असल्यास एका बोटाने नाकपुडीवर दाब द्या.
- दोन्ही नाकपुडय़ांतून रक्तस्त्राव होत असल्यास अंगठा आणि तर्जनीने दोन्ही नाकपुडय़ा काही वेळ बंद करा. रूग्ण तेंडाने श्वासोच्छ्वास करू शकेल. चार ते पाच मिनिटांत रक्तत्राव थांबेल.
- रूमालात बर्फाचा खडा ठेवून त्याचा नाकावर शेक द्या.
- रक्तस्त्राव पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ सुरूच राहिल्यास आणि रक्त लालभडक असल्यास डॉक्टरांकडे नेण्यात यावे.