मडगाव : इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज वास्कोच्या टिळक मैदानावर हैदराबाद एफसी आणि बेंगलोर एफसी यांच्यात लढत होणार आहे. स्पर्धेला चांगला प्रारंभ केल्यानंतर हैदराबाद एफसीने गुण गमावले. यानंतरही पहिल्या चार संघांमध्ये असल्यामुळे स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात त्यांना फॉर्म गवसणे महत्वाचे आहे. हैदराबाद एफसीचे 13 सामन्यांतून 4 विजय, 6 बरोबरी आणि 3 पराभवाने 18 गुण झाले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. बेंगलोर एफसीचे 13 सामन्यांतून 3 विजय आणि प्रत्येकी 5 पराभव व बरोबरीने 14 गुण झाले आहेत.
हैदराबाद आज बेंगलोरविरूद्धची लढत जिंकल्यास पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करण्यात मोठा हातभार लागेल याची प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ यांना कल्पना आहे. या घडीला स्पर्धेतील संधीचे चित्र समान आहे. बऱयाच लढती बरोबरीत सुटल्याने स्थिती अवघड झाली आहे. कारण त्यामुळे सर्वच संघ पहिल्या चार स्थानांसाठी झुंज देत असल्याची वस्तुस्थिती आहे. सर्वच संघांना संधी असल्याचे यावेळी प्रशिक्षक मार्क्वेझ म्हणाले. बेंगलोर एफसीला गेल्या सामन्यांत विजय मिळाला नसला तरी मार्क्वेझ यांना चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.