श्वानाचे अर्थात कुत्र्याचे लाड कोणी किती करावेत हे ज्याच्या त्याच्या हौसेवर अवलंबून आहे. पण या पृथ्वीच्या पाठीवर असा एक राष्ट्रप्रमुख आहे, ज्याने एका ‘स्थानिक’ श्वानाची स्मृती जपण्यासाठी राष्ट्रीय सुटी घोषित केली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही सुटी देण्यात येणार आहे. या राष्ट्रप्रमुखाचे नाव आहे गुरबांगुली बर्डीमुखानेदोव आणि देशाचे नाव आहे तुर्कमेनिस्तान. (आपल्याला काहीशा विचित्र वाटणाऱया नावाचा हा राष्ट्रप्रमुख स्वभावानेही विक्षिप्त आहे असे त्याच्या देशातील लोकही म्हणतात असे समजले आहे.)
राष्ट्रीय सुटी घोषित केली हे ही एकवेळ समजून घेता येईल. पण या राष्ट्रप्रमुखाने या कुत्र्याचा सोन्याचा पुतळाही उभा करून जगाला थक्क करून सोडले आहे. हा कुत्रा मध्य आशियातील शेफर्ड जातीच्या अलाबाई या प्रकारातील आहे. या राष्ट्रप्रमुखाला या जातीच्या कुत्र्यांचे अतिशय वेड आहे. हा कुत्रा त्यांना रशियाच्या अध्यक्षांनी भेट म्हणून दिला होता. तर अशा या कुत्र्यावर त्यांनी कविता, लेख आणि एक पुस्तकही लिहिले आहे. हे सारेच आपल्याला आ़श्चर्यचकित करणारे आहे. हे उदाहरण पाहिले की विक्षिप्तपणाला अंत नसतो ही बाब सर्वांनाच पटल्यावाचून राहणार नाही, हे निश्चित.
2006 पासून सत्तेवर
हा राष्ट्रप्रमुख 2006 पासून सत्तेवर आहे. तो स्वतःला तुर्कमेनिस्तानचा जणू रक्षकच समजतो. या देशाची लोकसंख्या 60 लाख असून तो आधी रशियाचा भाग होता. 25 वर्षांपूर्वी तो रशियापासून विभक्त झाला. त्याचे प्रशासन हुकुमशाही पद्धतीने चालते. या देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी स्वतःचाही एक सोन्याचा पुतळा उभा केला आहे. मात्र, या देशातील जनता गरीबीत जीवन कंठते आहे.