खेड पोलिसांकडून गतवर्षात 15 हून अधिक कारवाया
सचिन खेडेकर/ खेड
खेडसह ग्रामीण भागात राजरोसपणे चालवल्या जाणाऱया गावठी दारू विकी व हातभट्टय़ा, अवैध विदेशी दारूसाठा व विक्री, जुगार-मटका अड्डा, गांजा व गुटखा विक्रीप्रकरणी येथील पोलिसांकडून गतवर्षात 15 हून कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत 17 लाख 47 हजार 977 रूपयांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये दारूसंबंधी 9, जुगाराच्या 3, गांजाच्या 2 व गुटख्याच्या एका प्रकरणाचा समावेश असून धाडीत प्राप्त 22 हजार 500 लिटर गावठी दारू नष्ट देखील करण्यात आली.
खेडसह तिसंगी, भरणे, लोटे, लोटेमाळ, चिंचघर, आंबये, खोपी, रेल्वेस्थानक परिसर आदी गावांचा समावेश असून दारूच्या धाडीत सुमारे 13 लाख 75 हजार 370 रूपयांचा, मटका-जुगार अड्डय़ाच्या धाडीत 31 हजार 607 रूपयांचा, गांजाच्या धाडीत 1 लाख 66 हजाराचा, तर गुटख्याच्या धाडीत 1 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या त्या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली होती.
जानेवारीमध्ये तिसंगी-पिंपळवाडीतील जंगलमय भागात बेकायदेशीर दारूधंद्यावर पोलिसांनी धाड टाकत रसायानासह 4 लाख 41 हजार 100 रूपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये 12 हजार लिटरचे रसायन नष्ट करण्यात आले. पटवर्धन लोटे येथे गस्तीमध्ये 8520 रूपयांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. फेब्रुवारीमध्ये लोटे-कातेवाडीतील मटका-जुगार अड्डय़ावरील धाडीत 10757 रूपये, मार्चमध्ये तिसंगी-पिंपळवाडी येथे दारू अड्डय़ावरील धाडीत 1 लाख 58 हजाराचा मुद्देमाल सापडला. रेल्वेस्थानक परिसरात दीड लाख रूपये किंमतीचा चरस व गांजाच्या पुडय़ा बाळगणाऱयास पोलिसांनी चांगलाच दणका दिला. लोटेमाळ-म्हसोबावाडी येथे गोवा बनावटीची विदेशी मद्य व बिअरची अवैध विक्री करणाऱयांकडून 14 हजार 495 रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
एप्रिलमधील कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीस बंदी असतानाही चिंचघर-रेवेचीवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूसह विदेशी मद्याची विक्रीवर धाड टाकून 9 हजार 129 रूपयांची दारू जप्त करण्यात आली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दारू विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने चढय़ा दराने दारूची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे काही मद्यपींनी दारूसाठी दापोलीत जाऊन रिस्क घेतल्याचे दिसून आले होते.
सप्टेंबरमध्ये भरणेतील जुगार अड्डय़ावरील धाडीत 17 हजाराचा ऐवज, भरणे व चिंचघर येथील धाडीत 53 हजाराचा मुद्देमाल, ऑक्टोबरमध्ये शहरातील एका दुकानातून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पावणेदोन लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केला होता. नोव्हेंबरमध्ये तालुक्यातील आंबये-नवानगर नजीक विनापरवाना देशी/विदेशी दारूची विक्री केल्याप्रकरणी त्याच्याकडून साडेपाच हजार रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. खोपीतील जंगलमय भागात अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकत 1 लाख 4 हजार 850 रूपयांचा ऐवज जप्त केला.
डिसेंबरमध्ये तिसंगी-खोपकरवाडीतील जंगलमय भागात बेकायदेशीर गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड टाकून रसायनासह हातभट्टीचे साहित्य असा 3 लाख 30 हजार 350 रूपयांचा ऐवज हस्तगत केला. यामध्ये 10 हजार 500 लिटर रसायनाचा समावेश होता. मात्र, वाहतूक करणे शक्य नसल्याने तिथेच रसायन नष्ट करण्यात आले होते. तिसंगीतील जंगलमय भागात गावठी हातभट्टीच्या दारू अड्डय़ावर धाड टाकत 2 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला होता. लोटे औद्योगिक वसाहतीनजिक एका हॉटेल मागील मोकळय़ा जागेत बेकायदेशीर जुगार अड्डय़ावर धाड टाकून 3 हजार 850 रूपये किंमतीचे साहित्य जप्त केले. भोस्ते-जलालशहा मोहल्ला येथील जंगलमय भागात टाकलेल्या धाडीत बेकायदेशीर 800 ग्रॅम व 16 हजार रूपये किंमतीचा गांजा पोलीस पथकाने जप्त केला होता. भरणेत बेकायदेशीर गावठी हातभट्टीचा दारूधंदा करणाऱयावर अचानक धाड टाकून 25 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली होती. या धडक कारवायांमुळे अनधिकृत धंदे करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.