ऑनलाईन टीम / पुणे :
मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे 102 वे वर्ष आहे. श्री शिवाजी कुल व श्री शिवाजी कुल माजी कुलवीर संघातर्फे दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता उद्यान प्रसाद कार्यालयासमोरील पुणे शहर भारत स्काऊट गाईड संस्थेच्या प्रशिक्षण सभागृहात बाल कार्य सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा बाल कार्य सन्मान अभ्यासघर, सातारा या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, देणे समाजाचे या माध्यमातून सामाजिक कार्य करणा-या वीणा गोखले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभ्यासघर, सातारा या संस्थेचे विक्रम वाळिंबे हे बाल कार्य सन्मान स्विकारणार आहेत. सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, श्रीफळ, शाल असे सन्मानाचे स्वरुप आहे. कार्यक्रमात संस्थेच्या कुलवार्ता या अंकाचे प्रकाशन देखील होणार आहे.
अभ्यासघर मधे दरवर्षी विविध शाळांमध्ये शिकणा-या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक उपक्रम, प्रशिक्षणे आणि स्वयंअध्ययन वर्ग घेतले जातात. निवडक मुलांसाठी विविध अभ्यासविषयांवर दैनंदिन चर्चा, अभ्यासिका, अध्ययन कौशल्य प्रशिक्षण हे उपक्रम चालतात. शालेय विषयांच्या अभ्यासाबरोबरच मुलांचे व्यक्तिमत्त्व सुजाण आणि विवेकी व्हावे अभ्यासघराचा हेतू आहे. मुलांची मने कणखर ठेवणे हा अभ्यासघराच्या विचाराचा गाभा आहे. शुद्ध आणि स्वतंत्र विचार बाळगणारा आणि समाज, देशाविषयी बांधिलकी पाळणारा भावी नागरिक घडावा हा उद्देश अभ्यासघराच्या प्रत्येक उपक्रमात सांभाळला जातो. या कार्याबद्दल संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे.