तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
वीजबिल दरवाढ प्रकरणी शुक्रवारी भाजपाने आंदोलन केले. जोडबसवण्णा चौकातील विद्युत कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा यावेळी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. यावेळी पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. आंदोलन प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळातील वीजबिले माफ करा, राज्यातील शेतकर्यांची वीज जोडणी तोडू नका, अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. जोडबसवण्णा चौकात आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कोरोना काळातील वीज बिले माफ करण्याचे राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळलं नाही. भरमसाठ वीज बिले भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. तसेच थकबाकीमुळे शेतकर्यांचे कनेक्शनही तोडण्यात येत आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे आंदोलन केले. विद्युत मंडळ कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यावेळी कार्यकर्त्यांना पोलीसांनी अडविले. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये एक पोलीस अधिकारी तर दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी जगताप करीत आहेत.