रस्तेकामाचा बससेवेवर परिणाम : एकेरी वाहतुकीने होतेय कोंडी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी रस्तेकामाचा बससेवेवर मोठा परिणाम झाला असून काही ठिकाणी एकेरी वाहतूक तर काही ठिकाणी वळसा घालून बसना जावे लागत आहे. परिणामी प्रवाशांना वेळेत बस मिळत नसल्याने तासन्तास बसथांब्यांवर ताटकळत थांबावे लागत आहे.
अशोक चौक परिसरात काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे चन्नम्मा सर्कलमार्गे जाणाऱया काही बसेस पाटील गल्लीमार्गे धावत आहेत. त्यामुळे शनि मंदिरजवळ वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
अनलॉकनंतर बससेवा पूर्वपदावर येत आहे. मात्र, आता परिवहनला रस्ते विकासकामाचा फटका बसत आहे. रस्त्यांच्या कामामुळे काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. काही बसच्या मार्गात बदल झाला आहे. त्यामुळे वळसा घालून बसना जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांविना बस रिकामी फिरताना दिसत आहेत. याचा परिणाम परिवहनच्या महसुलावर होत आहे. किल्ला परिसरातील अशोक चौक ते सर्किट हाऊससमोरच्या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी बसस्थानकात ये-जा करणाऱया बसेसना वळसा घालूनच बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे शहरांतर्गत बसच्या मार्गात अचानक बदल करण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.