जीवाश्म संशोधक हैराण
ब्रिटनमध्ये जीवाश्म संशोधकांना अचानकपणे एका अशा विशाल आकाराच्या माशाचे जीवाश्म मिळाले आहे, जे आजपासून सुमारे 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी डायनासॉर नामशेष होण्याच्या काळातही वाचला होता. या जीवाश्माची ओळख ब्रिटनच्या युनिवर्सिटी ऑफ पोर्ट्समाउथच्या तज्ञांनी पटविली आहे. हा विशाल आकारातील मासा ग्रेट व्हाइट शार्कच्या समान असल्याचा अनुमान तज्ञांचा आहे. हा मासा अत्यंत विचित्र दिसून येत आहे.
प्राचीन काळात आढळून येणारा हा मासा मोठय़ा आकाराचा आहे. वैज्ञानिकांना मिळालेला हा मासा कोइलॅकन्थस प्रजातीचा हिस्सा आहे. पृथ्वीवर डायनासॉरचे अस्तित्व संपल्यावरही ही प्रजाती जिवंत राहिली आणि समुद्रात विहार करत राहिल्याचे प्राध्यापक मार्टिल यांनी सांगितले आहे.
लंडनमध्ये हाडांच्या एका वैयक्तिक संग्रहाची ओळख करण्यास सांगण्यात आले असता प्राध्यापक मार्टिल यांना या माशाच्या जीवाश्माचा शोध लागला आहे. या हाडांना एकत्र करणाऱयाने याला नमुन्यादाखल खरेदी केले होते. उडणाऱया पक्ष्याची ही हाडे असल्याचे संबंधित व्यक्तीला वाटले होते. प्राध्यापक मार्टिल यांनी हाडांची तपासणी केली असता ते माशाचे जीवाश्म असल्याचे स्पष्ट झाले.