प्रतिनिधी / वास्को
चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याची पूर्ण तयारी सरकारने केलेली असून हा प्रकार धक्कादायक आहे. सरकारने जनतेच्या पैशांतून उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये पूर्ण सेवा सरकारनेच द्यायला हवी. भाजपा सरकार खासगीकरणातून मिशन कमिशन मोहिम राबवीत असून जनतेने या खासगीकरणाविरूध्द एकत्र यावे काँग्रेस जनतेसोबत राहिल. सरकारला चिखलीच्या हॉस्पिटलचे खासगीकरण करू देणार नाही असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.
यासंबंधी संकल्प आमोणकर यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार व त्यांचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसेच मुरगावचे आमदार व मंत्री मिलिंद नाईक, दाबोळीचे आमदार व मंत्री माविन गुदिन्हो तसेच वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यावरही टीका केली. आमोणकर म्हणाले की, भाजपाचे सरकार आज जाईल तीथे खासगीकरण करीत आहेत. आता त्यांची नजर चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलवर गेली आहे. या हॉस्पिटलमध्ये योग्य सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे सोडून सरकार हे हॉस्पिटल खासगीत चालवायला देणार आहे. हे हॉस्पिटल उभारण्यासाठी जनतेचा पैसा वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारनेच सर्व सेवा द्यायला हवी. मुरगाव तालुक्यासाठी हे एकमेव हॉस्पिटल आहे. तालुक्यातील सर्व लोक या हॉस्पिटलचा लाभ घेत असतात. सरकार या लोकांना खासगी सेवेत ढकलणार आहे. या गरीब गरजू लोकांचे या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्रपणे वावरणे बंद होणार आहे. या हॉस्पिटलच्या खासगीकरणाच्या हालचाली गतीमान झालेल्या आहेत. खासगीकरणासाठीच हे हॉस्पिटल उभारण्यात आले होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जनतेवर अन्याय करणारे पाऊल सरकारने उचलले असताना तालुक्यातील मंत्री आमदार गप्प का, त्यांना हा प्रकार माहित नाही की माहित असूनही ते गप्प राहिले आहेत असा प्रश्न करून त्यांनी मुरगाव, वास्को व दाबोळीच्या आमदारांवर टीका केली. विश्वजीत राणे यांनी आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यापासून आरोग्य खात्यात गोंधळ माजलेला आहे. गोमेकॉमध्येही त्यांनी अनेक सेवांचे खासगीकरण केलेले आहे. भाजपा सरकारच्या मिशन कमिशन मोहिमेचाच हा भाग आहे असा आरोपही आमोणकर यांनी केला. चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये सरकारने अद्याप अनेक सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. पुरेसे डॉक्टर्स नर्सीस तसेच कर्मचारी व तंत्रज्ञ्यांची नेमणुक केलली नाही. अपुऱया सेवांमुळे हे हॉस्पिटल अद्याप पूर्णपणे वापरात आलेल नाही. गैरसोयीमुळे स्थानिक लोक त्या ठिकाणी जायचे टाळतात. आजही किरकोळ कारणांसाठी अनेक रूग्णांना गोमेकॉमध्ये पाठवले जाते. सरकारने सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात. स्थानिक लोक या हॉस्पिटलचा पूर्णपणे वापर करतील. खासगीकरणातून सरकार कुणाचे तरी भले करू पाहात आहे. मात्र, काँग्रेस या हॉस्पिटलचे पन्नास टक्के किंवा शंभर टक्के असे कोणत्याही प्रकारचे खासगीकरण करू देणार नाही. मुरगाव तालुक्यातील लोकांनी या खासगीकरणाविरूध्द एकत्र यावे. काँग्रेस जनतेच्या पाठीशी राहिल असे संकल्प आमोणकर यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला मुरगाव गट काँग्रेस अध्यक्ष महेश नाईक, तसेच शंकर पोळजी, सॅबी डिसोजा, समीर खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.