प्रतिनिधी / पणजी
पणजी महापालिका व गोवा राज्य शहर विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने नूतन सांतिनेझ येथील स्मशानभूमी, कब्रस्तान व दफनभूमीचे तसेच प्राणी निवाराचे उद्घाटन व महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरविकास सचिव तारिक थॉमस, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रीगीस व आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व धर्मासाठी सदर जागा निवडून देण्यात आली आहे. 11 हजार चौ.मी क्षेत्रात सुडाने 10 कोटीचा हा प्रकल्प बांधला आहे. सुंदर अशी वास्तू आहे.सर्वांनी ही वास्तू सांभाळणे आवश्यक असल्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी यावेळी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी स्मशानभूमीची पायाभरणी केली होती. परंतु कोरोनामुळे स्मशानभूमीचे काम प्रलंबित राहिले. जलदगतीने काम करून पणजीवासियांना स्मशानभूमी मिळालेली आहे. सुमारे 10 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने कंत्राटदार नेमावा अशी विनंती महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी केली. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते हिंदू स्मशानभूमी सोसायटीचे अध्यक्ष अवधूत आंगले यांचा श्रीफळ, शाल व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
51वर्षे काम पाहत आहे. पोर्तुगीज काळात ही जागा स्मशानभूमीसाठी देण्यात आली होती. त्यावेळी पुढाकार अनंत केणी यांनी घेतला होता. त्यानंतर पणजीत लोकवस्तीत वाढत गेली. त्यानंतर मंत्री गोन्साल्विस यांनी सदर जागा मिळवून दिली. प्रत्येक समाजाने यात सहकार्य केले असे अवधूत आंगले यांनी सत्कारपर भाषणात सांगितले.
सांतइनेज येथील स्मशानभूमीचे उद्घाटन सोहळा सोमवारी 10.30 वा. आयोजित करण्यात आला होता. परंतु सोमवारी निवडणूक आयोगातर्फे पालिका निवडणूकासंदर्भात व आचारसंहिता लागू करण्याची शक्यता असल्यामुळे सकाळी 8.45 वा. म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सदर स्मशानभूमीचे उद्घाटन घाईघाईने करण्यात आले. सांतइनेज स्मशानभूमीच्या बाहेरील भागाचे काम अजूनही अपूर्ण आहे.