एनआयएच्या दोषारोपपत्रात उल्लेख : एसडीपीआयचे 40 हून अधिक सदस्य होते सहभागी
प्रतिनिधी / बेंगळूर
मागील वर्षी 11 ऑगस्ट रोजी बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी आणि के. जे. हळ्ळी येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या दोषारोपपत्रातील माहिती उपलब्ध झाली आहे. हिंसाचार घडविण्यात सोशल डेमॉक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) संघटनेचे 40 हून अधिक सदस्य सहभागी झाले होते, असा उल्लेख या अहवालात आहे.
डी. जे. हळ्ळी व के. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 247 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 40 हून अधिक जण एसडीपीआय संघटनेचे सदस्य आहेत. फिरोज पाशा, मोहम्मद शरीफ, मुजम्मील पाशा हे प्रमुख आरोपी असल्याचा एनआयएने बेंगळूरच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात उल्लेख आहे. हे दोषारोपपत्र 10 फेब्रुवारी रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित होता. आरोपींनी कृष्ण जन्माष्टमी दिवशी दंगल घडविण्याचा कट रचला होता. मात्र त्याचवेळी पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांचा नातेवाईक असणाऱया नवीन याने फेसबुकवर वाद्ग्रस्त मजकूर पोस्ट केला होता. या परिस्थितीचा गैरफायदा घेत समाजकंटकांनी हिंसाचार घडविला होता. तसेच फेसबुक व इतर सोशल मीडियाद्वारे हिंसाचारात सहभागी होण्यासाठी अप्रत्यक्षपणे आवाहन केल्यामुळे बाहेरहूनही अनेकजण सहभागी होण्यास कारणीभूत ठरले. पोलीस स्थानकावरील हल्ला होण्यासही सोशल मीडियावरील प्रक्षोभक विधाने कारणीभूत असल्याचे एनआयएने आपल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे.