प्रतिनिधी / धारबांदोडा
एन एच 4 या गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर अनमोड घाट ते खांडेपारपर्यंत हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याहस्ते या कामाला प्रारंभ करण्यात आला. अंदाजे रु. 32 कोटी खर्चून बत्तीस किलो मिटर अंतराच्या रस्त्यावर हॉटमिक्स थर घालण्यात येणार आहे. मोले बाजार येथून या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
येणाऱया काही महिन्यात गोव्यातील सर्व रस्ते हॉटमिक्स होणार आहेत. रस्त्यांचे काम उच्च दर्जाचे होणार असून येत्या मे अखेरपर्यंत सर्व रस्ते चकाचक होतील. सध्या जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण प्रथम पूर्ण केले जाईल व त्यानंतरच नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आहे, अशी माहिती मंत्री पाऊसकर यांनी दिली.
पर्यावरण संवर्धन व विकास हा समतोल राखूनच प्रकल्प उभारण्याचे सरकारचे धोरण आहे. फोंडा बेळगाव महामार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मोले वासियांना विश्वासात घेऊनच काम पुढे नेले जाईल. पुढील दहा वर्षात हे काम पूर्ण होणार असून चौपदरीकणात कमीत कमी झाडे कापली जातील, शिवाय रानटी जनावरांना मुक्त संचार करण्यासाठी योग्य प्रमाणात नियोजन केले जाईल असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
तामनार वीज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोले येथे उपवीज केंद्र स्थापन करून 11 केव्हीची वाहिनी मोलेवासीयांसाठी टाकली जाईल. या केंद्राच्या शुभारंभानेच तमनार खकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे मोले वासियांना 24 तास वीज पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले।
यावेळी मोलेच्या सरपंच तन्वी केरकर, उपसरपंच सुशांत भगत, पंचसदस्य रामकृष्ण गांवकर, बाबू शेळके, सावर्डे भाजपा अध्यक्ष विलास देसाई, सचिव मच्छिंद्र देसाई, साकोर्डाचे सरपंच दिना गांवकर, बांधकाम खात्याचे प्रधान अभियंते उत्तम पार्सेकर, कार्यकारी अभियंते शशिकांत देसाई, सहाय्यक अभियंते चंदन परवार, तांत्रिक सहाय्यक आनंद वाघुर्मेकर, सावर्डे भाजपा मंडळ उपाध्यक्ष आपा गांवकर, कालिदास नाईक आदी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षात एकाच वेळी 30 कि. मी. अंतरच्या राष्ट्रीय महामार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण झालेले नाही. मात्र मंत्री दीपक पाऊसकर यांच्या कारकिर्दीत हे शक्य झाले आहे. त्याचे संपूर्ण श्रेय हे पाऊसकर यांना जाते. त्यांनी काम करण्यासाठी स्वातंत्र्य दिल्याने अधिकाऱयांची जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम खाते योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. सावर्डेसारखा ग्रामीण भाग दुर्लक्षित राहिला होतो, जो विकासाच्या प्रवाहात आला आहे, असे उत्तम पार्सेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सुशांत भगत यांनी बांधकाममंत्र्यांचे मोले पंचायतीवर विशेष लक्ष असल्याचे सांगून मोले भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लावतानाच अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे सांगितले. दिनानाथ गांवकर यांचेही भाषण झाले. तन्वी केरकर यांनी स्वागत तर रामकृष्ण गांवकर यांनी आभार मानले.