ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली आहे. मागील 24 तासात 8 हजार 998 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 88 हजार 183 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 286 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 6,135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 49 हजार 484 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 85 हजार 144 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.66 % तर मृत्युदर 2.39 इतका आहे.
- मुंबईत 10,452 ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 1,103 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 654 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,29,843 वर पोहचली आहे. तर 3,07,027 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,487 इतकी आहे. सद्य स्थितीत 10 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.