नॅशनल क्रश आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने स्वतःचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘मिशन मजनू’चे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लखनौ शहरात होत आहे. रश्मिकाने समाजमाध्यमांवर चित्रपटच्या सेटमधून स्वतःची एक चित्रफित प्रसारित करत याची माहिती दिली आहे.
या चित्रपटाची निर्मिती आरएसव्हीपी आणि गिल्टी बॉय असोसिएशनकडून केली जात आहे. या चित्रपटात रश्मिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसून येणार आहे. स्पाय थ्रिलर चित्रपटात रश्मिका एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ती एका रॉ हस्तकाच्या भूमिकेत एका गोपनीय मोहिमेसाठी पाकिस्तानात जात असल्याचे दिसून येणार आहे. मिशन मजनू या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू बागची करत आहेत. तर चित्रपटात सिद्धार्थ आणि रश्मिका यांच्यासह कुमुद मिश्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.