प्रतिनिधी / कोल्हापूर
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण 90 दिवसांचा कालावधी लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा जाहीर झाल्यानंतर फक्त 20 दिवसात अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा. स्टॅटसारखे विषय वस्तुनिष्ठ पद्धतीने कसे शिकवायचे. बी. व्हॉक. अभ्यासक्रमाला मान्यता आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत विद्यापीठ प्रशासनाला अधिसभा सदस्यांनी धारेवर धरले. पुढील परीक्षांचे धोरण ठरवावे, अशा प्रकारची मागणी यावेळी केली. प्रश्नोत्तराच्या तासात फक्त दोनच मुख्य प्रश्नावर चर्चा झाली.
अधिसभा सभेत मधुकर पाटील आणि डॉ. मनोजकुमार गुजर यांनी विचारलेल्या दोन मुख्य प्रश्नावर चर्चा झाली. याला उपप्रश्न उपस्थित करीत विद्यापीठ प्रशासनाला अधिसभा सदस्यांनी धारेवर धरले. शैक्षणिक पातळीवर कोणते धोरणात्मक निर्णय घेतले, असा प्रश्न डॉ. एस. डी. डोळेकर यांनी उपस्थित केला. अभ्यासक्रम पूर्ण नसताना परीक्षा घेवून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवणार असा प्रश्न डॉ. सतीश घाडगे यांनी विचारला. त्यांनी धोरणात्मक निर्णय घेताना शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
परीक्षा संचालक उत्तर देण्यासाठी उभे राहिल्यानंतर डॉ. अरुण पाटील यांनी त्यांना उत्तर देण्याचा अधिकार नसल्याने सांगत रोखले, कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अध्यक्ष ज्यांना आदेश देतील, त्यांनी उत्तर द्यावे असा नियम असल्याचे सांगितले. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक पळसे यांनी डॉ. डी. जी. कणसे समिती, विद्या परिषद, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेवून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी अभ्यासक्रम आणि परीक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले. डॉ. निळकंठ खंदारे यांनी कोरोनाच्या कालावधीत ठरलेली हजेरी पूर्ण करूनही ज्यांना आर्थिक रजा व अतिरिक्त सीएल पडल्या असतील तर त्याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने करून प्राध्यापक व कर्मचाऱयांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात निवेदन किंवा तक्रार आली नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. डॉ. आर. आर. कुंभार, श्रीनिवास गायकवाड यांनी सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला. यावर कुलगुरूंनी प्राचार्य संघटनेच्या मागणीवरून नियुक्ती केली आहे, त्यांच्या नोकरीत खंड पडला असला तरी त्यांचे नुकसान होणार नसल्याचे सांगितले.
प्रश्नपत्रिकी ओएमआरसीट विद्यापीठ पुरवणार असल्याने प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि डॉ. अरुण पाटील यांनी विद्यापीठाचे आभार मानले. अधिसभा सदस्यांना सामावून घेवून विद्यापीठ प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावे, अशी मागणी मधुकर पाटील व डॉ. डेळेकर यांनी केली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विचार केला जाईल, असे सांगत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्णय राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घेतल्याचे सांगितले. मनोजकुमार गुजर यांनी शिक्षकांप्रमाणे प्राचार्य व प्राध्यापकांचे लसीकरण करण्याची मागणी केली.
मास्टर प्लॅन तयार करा
कोरोना असाच राहिला तर पुढील वर्षी कशा पद्धतीने शैक्षणिक वर्ष पूर्ण करायचे. त्यासंदर्भातील मास्टर प्लॅन आतापासूनच विद्यापीठ प्रशासनाने तयार करावा. समिती तयार करावी, तसेच बैठकांचे नियोजन करावे. चर्चेअंती निर्णय घ्यावा. तसेच खेळाडूंना ग्रेस गुण त्वरीत द्यावेत, अशी मागणी केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करा
आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करा. जेनेकरून नवीन पिढीला त्यांच्या कार्याची माहिती मिळेल, अशी योजना विद्यापीठाने करावी. प्रताप भैया माने (सदस्य, शिवाजी विद्यापीठ अधिसभा)