वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीपासून ते सध्याच्या स्थितीपर्यंत भांडवली बाजारामध्ये आयपीओचीच चर्चा ऐकायला मिळते आहे. याचाच एक भाग म्हणून दररोज एक कंपनी आपला आयपीओ सादर करत आहे. यामध्ये आता सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) 17 मार्च रोजी खुला होणार असून 19 मार्च रोजी आयपीओ बंद होणार आहे.
प्रमुख गुंतवणूकदार 16 मार्चच्या दिवशी बोली लावू शकणार आहेत. आयपीओसाठी मूल्य 303 ते 305 रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आले आहे. बँकेने शुक्रवारी व्हर्च्युअल परिषदेत या संदर्भात माहिती दिली आहे. सदरच्या आयपीओ अंतर्गत 81,50,000 नवीन समभाग सादर करण्यात येणार असून याव्यतिरिक्त समभागधारकांकडून 1,09,43,070 इक्विटी समभागांची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
582 कोटी उभारण्याचे संकेत
सदरच्या आयपीओमधून 582 कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. ओएफएसच्या माध्यमातून इंटरनॅशनल फायनान्शिअल कॉर्पोरेशन(आयएफएसी), गाजा कॅपिटल, एचडीएफसी होल्डींग्स, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी, डीडब्लूएम मॉरीशस लिमिटेड आणि अमेरिकॉर्प वेंचर्स समभागाचे सादरीकरण करणार आहेत.