ट्राव संघाने नमविले, आता दुसऱया स्थानावर
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबच्या आय-लीग जेतेपदाच्या मोहिमेला काल आणखी एक जबरदस्त धक्का बसला. काल कोलकातातील कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंगने चर्चिल संघाला 4-1 गोलांनी दारूण पराभवास सामोरे केले.
मोहम्मेडन स्पोर्टिंगसाठी पेद्रू मांझीने दोन तर हिरा मोंडल व वानलाबिया छांगटेने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत चर्चिल ब्रदर्सचा एकमेव गोल लुका माजसेनने पेनल्टीवर केला. या निकालाने चर्चिल ब्रदर्स क्लब आणि ट्राव या दोन्ही संघांचे 13 सामन्यांतून प्रत्येकी 25 गुण झाले. मात्र चांगली गोल सरासरीमुळे ट्रावने चर्चिल ब्रदर्सला दुसऱया स्थानावर फेकले. चर्चिल ब्रदर्स क्लबचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. मागील सामन्यात त्यांना गोकुळम केरळकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुपारी कोलकातातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळविण्यात आलेली गोकुळम केरळ आणि रियल काश्मीर एफसी यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला रियल काश्मीरच्या आसित अहमद भटने गोल करून आघाडी घेतली होती. मात्र 24 व्या मिनिटाला डॅनीस अँट्वीने पेनल्टीवर गोकुळम केरळचा बरोबरीचा गोल केला. या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. गोकुळम केरळचे आता 13 सामन्यांतून 23 तर रियल काश्मीरचे 13 सामन्यांतून 18 गुण झाले आहेत. दुसऱया सामन्यात ट्रावने आणखी एका विजयाची नोंद करताना पंजाब एफसी संघाला कोमरॉन तुरसूनोव्हने सामन्याच्या 81 व्या मिनिटाला नोंदविलेल्या एकमेव गोलमुळे पराभव केला. विजयच्या तीन गुणांनी ट्रावचे आता 13 सामन्यांतून 25 तर पंजाब एफसीचे 13 सामन्यांतून 19 गुण झाले आहेत.