प्रचारासाठी मागितली एक महिन्याची सुटी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वतःचे उमेदवार घोषित केले आहेत. हे उमेदवार स्वतःचा विजय निश्चित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. राज्यातील आउसग्राम विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कलिता माझी ह्यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे काम काहीसे अवघड ठरले आहे. कलिता या डोमेस्टिक हेल्पर म्हणजेच मोलकरणीचे काम करतात. स्वतःच्या निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी त्यांना अनेक घरांमधील कामे संपवायची असतात. त्यानंतरच त्या प्रचाराला जातात.
स्वतःच्या या समस्येतून बाहेर पडण्यासाठी कलिता यांनी संबंधित घरमालकांकडून एक महिन्याची सुटी मागितली आहे. पूर्व वर्धवान जिल्हय़ातील एका गरीब कुटुंबाची सदस्या असलेल्या कलिता यांना आउसग्राम मतदारसंघाचे भाजपने तिकीट दिले आहे. हा मतदारसंघ राखव आहे. माझे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही. विवाहानंतरही आर्थिक स्थितीत कुठलीच सुधारणा झालेली नाही. माझा पती प्लंबर असून घर चालविण्यासाठी मदत व्हावी याकरता काही घरांमध्ये काम करत असल्याचे कलिता यांनी सांगितले आहे.
भाजपने गुरुवारी आउसग्राम मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केल्यावर कलिता यांचे जणू जीवनच बदलले आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱया भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीत विजयी झाल्यास कलिता आउसग्रामच्या आमदार असतील. पण कलिता यांच्यासाठी हे काम सोपे नाही. त्यांना निवडणूक लढण्यासाठी अन्य उमेदवारांपेक्षा अधिक संघर्ष करावा लागतो.
सर्वप्रथम कलिता दररोज लोकांच्या घरात जाऊन त्यांची कामे संपवतात, त्यानंतर प्रचारासाठी बाहेर पडतात. आता त्यांनी संबंधित घरमालकांकडून एक महिन्याची सुटी मागितली आहे. कलिता या भाजपच्या सक्रीय सदस्या असून अलिकडेच त्यांनी पंचायत निवडणूकही लढविली आहे. कलिता यांच्याकडे एकूण 6 साडय़ा असून जनधन खात्यात दीड हजार रुपये आहेत, जे केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत प्राप्त झाले आहेत.