प्रतिनिधी / बेळगाव
कृषी व नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्रज्ञ तसेच शेती आणि पाण्याचे संसाधन, अर्थशास्त्र क्षेत्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. परशराम पाटील यांचा येथील गुरुवार पेठमधील लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. परशराम पाटील सध्या युनायटेड नेशन्स, डेव्हलपमेंट बँक, आणि भारत सरकार आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये सल्लागार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून डॉक्टरेट तर सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. तसेच त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी युवा संशोधक पुरस्कार, एमटीसी ग्लोबल एक्सलन्स पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नागरिक पुरस्कार, महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच त्यांची 6 पुस्तके आंतरराष्ट्रीय पेडिटमध्ये प्रकाशितदेखील झाली आहेत. जगातील कृषी आणि नैसर्गिक संसाधने अर्थशास्त्राच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याची दूरदृष्टी असल्याने त्यांचा याठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित, समन्वयक विनायक जाधव, रवी साळुंखे उपस्थित होते.