सार्वजनिक कार्यक्रम नको : पोलीस अधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. त्यामुळे यंदाची होळी व रंगोत्सवावर कोरोनाचे सावट असणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे. कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी प्रशासनाला प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील मार्केट पोलीस स्थानकात बुधवारी शांतता समितीची बैठक झाली. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आदी अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले. यावेळी मेघन लंकरकांडे, ऍड. अमर यळ्ळूरकर, अजित कोकणे, विनायक बावडेकर, मिलिंद बसरीकट्टी, सुनील जाधव, बाळू नाईक, संजय पाटील, यल्लारी बिडीकर, बाबुलाल राजपुरोहित, पवन शहापूरकर आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. कोरोनाचा फैलाव वाढेल असे कोणतेही कृत्य करू नये. खासकरून सार्वजनिक होलिका दहनाचे कार्यक्रम करू नयेत. अनेक ठिकाणी रंगोत्सवाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा ते करता येणार नाहीत. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले आहे.