केपटाऊन
पृथ्वीवर सर्वात महाकाय जीव असणाऱयांपैकी एक जीव म्हणून हत्ती या प्राण्याची ओळख जगात आहे. सध्या आफ्रिकेतील हत्ती लुप्त होण्याची चिंता अधिक प्रमाणात व्यक्त होत आहे. अवैध स्वरुपाची होत असणारी शिकार आणि तसेच जंगलाचे घटत चाललेले क्षेत्र यामुळे दिवसेंदिवस हत्तींची संख्या कमी होत आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) यांच्याकडून नवीन सादर करण्यात आलेल्या रेड यादीच्या अहवालात आफ्रिकन हत्तींचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. आफ्रिकन हत्तीच्या दोन प्रजाती या रेड यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे आययुसीएनचे महासंचालक ब्रूनो ओबेरले यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी अवैध स्वरुपाची शिकार व जंगलासाठी नियमावली करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. मागील 31 वर्षांच्या कालावधीमध्ये जंगली हत्तींची संख्या ही 86 टक्क्यांनी कमी होत गेल्याची नोंद आहे. वर्ष 2008 नंतर शिकार करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.