अँटीग्वा : येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत बुधवारी खेळाच्या तिसऱया दिवसांअखेर निसांका आणि थिरिमने यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर लंकेने विंडीजविरूद्ध पहिल्या डावात 8 बाद 253 धावा जमविल्या. पावसाच्या अडथळय़ामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला. विंडीजने पहिल्या डावात 354 धावा जमविल्या आहेत. लंकेचा संघ अद्याप 101 धावांनी पिछाडीवर आहे.
या कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवशी केवळ 42 षटकांचा खेळ झाला. लंकेने 3 बाद 136 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांच्या पाच गडय़ांनी 118 धावांची भर घातली. लंकेतर्फे 22 वर्षीय निसांकाने शानदार अर्धशतक झळकविले असून तो 4 चौकारांसह 50 धावांवर खेळत आहे. थिरिमनेने 6 चौकारांसह 55, चंडीमलने 6 चौकारांसह 44, ओशादो फर्नांडोने 1 चौकारांसह 18, धनंजय डिसिल्वाने 3 चौकारांसह 39, डिक्वेलाने 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. बुधवारी खेळाच्या पहिल्या सत्रात लंकेने चंडीमल आणि धनंजय डिसिल्वा हे दोन फलंदाज गमविले. उपाहारानंतर लगेच पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. या कालावधीत लंकेचा डिक्वेला आणि लकमल बाद झाले. चहापानानंतर निसांकाने चिवट फलंदाजी करत आपले अर्धशतक झळकविले. या मालिकेतील पहिल्या कसोटीत निसांकाने पदार्पणातच शतक झळकविले होते. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली आहे. विंडीजतर्फे जोसेफ आणि होल्डर यांनी प्रत्येकी 2 तर रोश, गॅब्रियल, मेयर्स आणि ब्लॅकवूड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.