मालिकेत पाकशी बरोबरी
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
यजमान दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकशी 1-1 अशी बरोबरी साधताना रविवारी झालेल्या चुरशीच्या दुसऱया सामन्यात पाकचा 17 धावांनी पराभव केला. पाकचा सलामीचा फलंदाज फख्र झमानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. झमानने एकाकी लढत देत 155 चेंडूत केलेली 193 धावांची केलेली तडाखेबंद खेळी पाकला पराभवापासून वाचवू न शकल्याने ती वाया गेली.
या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 6 बाद 341 धावा जमवित पाकला 342 धावांचे कठीण आव्हान दिले होते. त्यानंतर पाकचा सलामीचा डावखुरा फलंदाज फख्र झमानने शेवटपर्यंत खेळपट्टीवर चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाची संधी निर्माण करून दिली होती. डावातील 38 व्या षटकांत पाकची स्थिती 7 बाद 205 अशी होती. त्यानंतर झमानने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमक हल्ला सुरू केला आणि त्याने 155 चेंडूत 10 षटकार आणि 18 चौकारांसह 193 धावा झोडपल्या. झमान नवव्या गडय़ाच्या रूपात 50 व्या षटकांतील पहिल्या चेंडूवर धावचीत झाला. या षटकात पाकला 31 धावांची गरज होती. झमानने फटका मारून एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्यासाठी जात असताना यष्टिरक्षक डिकॉकने लाँगऑफवरील मार्करमला गोलंदाजांच्या दिशेने चेंडू टाकण्याचे संकेत दिले. त्यामुळे झमान थोडासा रिलॅक्स होऊन धावू लागला. पण मार्करमने फलंदाजांच्या दिशेने थ्रो केला आणि झमान क्रिझमध्ये पोहचण्यापूर्वी यष्टी उडाल्या. दुसरी धाव घेण्याच्या नादात झमान धावचीत झाल्याने पाकला हा सामना शेवटी 17 धावांनी गमवावा लागला. या षटकात त्यांना 13 धावांच जमविता आल्या. कर्णधार बाबर आझमने तसेच द.आफ्रिकेचा कर्णधार बवुमानेही झमानच्या खेळीचे कौतुक केले. 2018 साली फक्र झमानने वनडे क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरूद्ध द्विशतक झळकविले होते. मात्र त्याचे दुसरे द्विशतक केवळ 7 धावांनी हुकले.
पाकच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. कर्णधार बाबर आझमने 33 चेंडूत 6 चौकारांसह 31, असिफ अलीने 2 चौकारांसह 19, शदाब खानने 1 चौकारांसह 13, अश्रफने 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. हसनेन 3 चौकारांसह 12 धावावर नाबाद राहिला. पाकच्या डावात 10 षटकार आणि 35 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्त्जेने 3 तर फेहलुक्वायोने 2 तसेच रबाडा, एन्गिडी, शम्सी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना येत्या बुधवारी सेंच्युरियन येथे खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका- 50 षटकांत 6 बाद 341, पाक- 50 षटकांत 9 बाद 324 (फख्र झमान 155 चेंडूत 193, बाबर आझम 31, असिफ अली 19, शदाब खान 13, अश्रफ 11, हसनेन नाबाद 12, नॉर्त्जे 3-63, फेहलुक्वायो 2-67, रबाडा 1-43, एन्गिडी 1-66, शम्सी 1-60).