प्रतिनिधी/ सातारा
जीवनावश्यक वस्तू सुरू
विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच शनिवारी सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच दुकाने सकाळपासून बंदच होती. फक्त जीवनावश्यक दुकाने चालु असल्याने नागरिक आवश्यकता पडल्यास घराबाहेर पडत होते. दुपारी शहरात शुकशुकाट पसरला होता. रस्ते ओस पडले होते. यामुळे पोलीसांवरील ताण ही कमी झाला होता.
वाहतूक बंद
शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यानंतर लॉकडाऊन लागू होणार असल्याने आठच्या आत घरात पोहचण्याची गडबड सर्वत्र सुरू होती. यामुळे फक्त खाजगी वाहनांसह प्रवासी वाहने ही रस्त्यावर दिसत नव्हती. शनिवारी सकाळी सर्वच वाहतूक बंद असल्याने रस्ते ओस पडले होते. वाहतूक कोंडी कमी होवून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. यामुळे वाहनांमुळे होणाऱया प्रदुषणात घट झाली होती.
फक्त पोलीस व होमगार्ड
विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सातारकर नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शांतता दिसत होती. सकाळी फक्त कामनिमित्त बाहेर पडणारे लोक होते. तर दुपारनंतर रस्त्यावर पोलीसांचा फौज फाटा आणि होमगार्ड दिसत होते. कोणीच घराबाहेर नसल्याने पोलीसांकडून कारवाई झाली नाही.
घरात घरात खेळीमेळीचे वातावरण
लॉकडाऊनमध्ये घराबाहेर न पडण्याचे आदेश असल्याने सर्वच जण घरात बसून होते. यामुळे घरातील सर्व सदस्य पुन्हा एकत्र आल्याने घराघरात आनंदाचे वातावरण होते. घरातच गप्पांची मैफिल रंगली होती. तर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. गृहिणींनी आवडीचे पदार्थ बनवत रोजच्या जेवणात वेगळा आनंद निर्माण केला. यामुळे लॉकडाऊनमुळे निर्माण झालेला चिंतेचा भार कमी झाला होता.