वाघोटन बाजारपेठेत किरकोळ वादातून घटना
प्रतिनिधी / देवगड:
किरकोळ वादातून कसबा वाघोटन येथील मुश्ताक उस्मान काझी (73) यांच्या छातीत तेथील जिक्रिया अली बोरकर (85) याने अचानक चाकू खुपसला. गंभीर स्थितीत मुश्ताक काझी यांना देवगड येथे आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वाघोटन बाजारपेठ येथे घडली. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार संशयित जिक्रिया बोरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून विजयदुर्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा वाघोटन येथील जिक्रिया बोरकर व मुश्ताक काझी हे दोघे मंगळवारी सायंकाळी वाघोटन बाजारपेठ येथील समीर मुल्ला यांच्या घरासमोर बोलत होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. या वादात जिक्रिया बोरकर यांनी आपल्या हातातील लोखंडी चाकू मुश्ताक काझी यांच्या छातीमध्ये डाव्या बाजूला खुपसला. ही घटना लक्षात येताच नजीकच्या ग्रामस्थांनी काझी यांच्याकडे धाव घेतली. मुश्ताक काझी यांचा मुलगा सल्लाउद्दीन हे तात्काळ घटनास्थळी येताच त्यांनी रक्ताच्या थारोळय़ात पडलेले वडील मुश्ताक काझी यांना ग्रामस्थांच्या मदतीने देवगड येथे आणले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती सल्लाऊद्दीन काझी यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे व पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी जात संशयित जिक्रिया बोरकर याला ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनीही घटनास्थळी जात माहिती घेतली. सल्लाउद्दीन काझी यांच्या फिर्यादीनुसार संशयित जिक्रिया बोरकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी डॉ. कटेकर करीत आहेत.