कुडचडे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांचे स्पष्टीकरण : लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे पालिका परिसरात सध्या कचरा कर वाढीवरून जो गोंधळ सुरू आहे त्यात सदर वाढ आपण केल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यात कोणतेच तथ्य नाही, असे स्पष्टीकरण कुडचडेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन दिले.
सदर निर्णय हा 4 नोव्हेंबर, 2020 रोजी झाला होता. त्यावेळेस कुडचडे पालिकेच्या मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता व पालिकेचे अधिकार सरकारने नेमलेल्या प्रशासकांजवळ होते. त्यावेळी सरकारकडून सदर आदेश पाठविण्यात आला होता व त्यात सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले होते. त्या आदेशानुसार सदर कर आकारण्यात आलेला आहे, असे होडारकर यांनी सांगितले.
कुडचडे बाजारात जो दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे त्याबद्दल आपण एवढेच सांगू इच्छितो की, सदर आदेशाची अंबलबजावणी सुरू झाली त्यावेळेस आपण नगराध्यक्ष नव्हतो. त्यानंतर यंदा 20 मार्च रोजी निवडणुका झाल्या व आपण परत एकदा नगराध्यक्ष बनलेलो आहे. गेल्या वेळी जेव्हा आपण नगराध्यक्ष होतो तेव्हा मंडळाची परवानगी घेऊन सदर कचरा कर कुडचडे पालिकेतील जनतेला परवडणारा नसल्याने सरकारने हा कर दिवसाला एक रुपया असाच ठेवावा असे निवेदन सरकारला पाठविले होते. याची सर्वांनी व खास करून कुडचडे परिसरात विनाकारण आणि कोणतेच तथ्य नसलेल्या बाबींवरून लोकांची शांती बिघडविण्याचा प्रयत्न जे करत आहेत त्यांनी नोंद घ्यावी, असे उद्गार नगराध्यक्ष होडारकर यांनी काढले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रदीप नाईक व माजी नगरसेवक आनंद प्रभुदेसाई उपस्थित होते.