आणखी 20 व्हेंटिलेटर खरेदी करणार
आरोग्य यंत्रणेच्या मदतीला शिक्षक घेणार
45 वर्षांवरील पत्रकारांसाठी लसीकरण कॅम्प
विद्युत दाहिन्यांसाठी पालिकांना निधी
गरज भासल्यास खासगी रुग्णालये घेणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कुडाळ येथील महिला रुग्णालयात एक हजार लिटर प्रतिमिनिट, कणकवली येथे 500 लिटर प्रतिमिनिट आणि सावंतवाडी येथे 500 लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी 20 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नातेवाईकांच्या चाचण्या करणार
जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरात अनावश्यक फिरणाऱया व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्यात, अशा सूचना देऊन पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, रुग्णांना भेटायला येणाऱया नातेवाईकांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. नातेवाईक रुग्णांना भेटायला येणार नाहीत अशी व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी करावी. आवश्यकता असेल त्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात येईल. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून जी कामे आरोग्य यंत्रणेशी संबंधित नाहीत ती शिक्षकांना देण्यात येणार आहेत. सरपंच आणि उपसरपंचांनाही विमा कवच असावे, यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करावा. जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे सक्तीचे असेल. लसीकरण वाढवावे. 45 वर्षांवरील पत्रकारांची यादी करून त्यांच्यासाठी कॅम्प घेण्यात यावा. ग्राम कृती समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यात तलाठी व पोलीस पाटील हे सक्रिय नसतील तर जिल्हाधिकाऱयांनी त्यांच्यावर कारवाई करावी. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांची दररोज तपासणी करण्यात यावी. तालुकास्तरावर तात्काळ लागणाऱया रुग्णवाहिका भाडय़ाने घ्याव्यात. नगरपालिका सफाई कामगारांसाठी पीपीई कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेथे आवश्यकता आहे तेथे तालुकास्तरावर खासगी रुग्णालये अधिग्रहीत करावीत. शासकीय इमारती, रुग्णालये नवीन पद्धतीने कशी सॅनिटाईज करता येतील, याचा जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी तपास करावा. कंटेनमेंट झोनमध्ये, घरांवर मोठे बॅनर लावावेत. प्रत्येक नगरपालिकेला 5 लाख रुपये आणि नगरपंचायतीला 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत. नगरपालिकांमध्ये सेमी विद्युतदाहिनी व प्राधिकरणात पूर्ण विद्युतदाहिनी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आजपासून कडक पोलीस कारवाई
जिह्यातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनही त्यासाठी काम करत आहे. अत्यावश्यक असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे. कोरोनाचे संकट हे सर्वांवरच आहे. जिल्हय़ात सोमवारपासून पोलीस कडक कारवाई सुरू करणार आहेत. जनतेने याची दखल घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.