ऑनलाईन टीम / मुंबई :
संगीतातील प्रसिद्ध नदीम – श्रवण जोडी फेम श्रवण राठोड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर उपचारासाठी त्यांना मुंबईतील एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा आहे. कोरोनासह प्रकृतीचे अन्य आजार असल्याने सद्य परिस्थितीत त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे.
डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणल्यावर त्यांची प्रकृती आणखी ढासळली नसली, तरी चिंताजनक आहे. दरम्यान, सद्य स्थितीत बॉलीवुड मधील अनेक कलाकार कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत.
- आशिकीपासून नदीम – श्रवण जोडी हिट
1990 पासून बॉलीवूडमध्ये नदीम श्रवण जोडगोळीचा दबदबा आहे. नदीम सैफी आपले साथीदार श्रवण राठोड यांच्याबरोबर मिळून धून तयार करतात. फिल्म आशिकी मधील त्यांची गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. दरम्यान, गुलशन कुमार यांच्या हत्येत नाव समोर आल्यामुळे नदीम आणि श्रवण यांची जोडी फुटली. नदीम हे 2000 पासून अज्ञातवासात आहेत.
नदीम – श्रवण जोडीने आशिकी, साजन, सडक, दिल है के मानता नही, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, धडकन, परदेस यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले आहे.