वार्ताहर / मार्गताम्हाने
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे मंगळवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास लागलेल्या अग्नागीत दुचाकीसह चारचाकी वाहने जळून खाक झाली. येथील अजित साळवी यांची ही वाहने घराखालील पत्र्याच्या शेडमध्ये पार्क केलेली होती. यात वाहनांचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे.
जवळच असलेल्या रुग्णालयाच्या कंपाऊंडरने ही आग पाहिल्याने ती लगेच आटोक्यात आणण्यात आली अन्यथा साळवी यांचे निवासस्थान, अर्बन बँकेची इमारत, किराणा मालाचे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते. आग आटोक्यात आल्याने नजीकच्या इमारतींना मोठी झळ पोहोचली नसली तरी त्यांच्या शटरचे व वीजमीटरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग लागली की लावली गेली याचा तपास चिपळूण पोलीस करीत आहेत. सद्यस्थितीत याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
मार्गताम्हाने बाजारपेठेत अजित साळवी यांचे निवासस्थान आहे. पहिल्या मजल्यावर त्यांचे घर असून तळमजल्यात चिपळूण अर्बन बँकेची शाखा व चंद्रकांत चव्हाण यांचे किराणा मालाचे दुकान आहे. याला लागूनच पत्र्याची शेड असून शेडमध्येच नेहमीप्रमाणे वाहने ठेवण्यात आली होती. नजीकच महा-ई सेवा केंद्र व गँस सिलेंडरचे कार्यालय आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास वाहनांना आग लागली. नजीक असलेल्या डॉ. विनय नातू यांच्या हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीला असलेल्या कंपाऊंडरला ही आग लागल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने सर्वांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. साळवी यांनी निवासस्थानातून पत्नी, मुलांसह सर्वांना बाहेर काढले. जवळपासच्या ग्रामस्थांनी आग आणण्यासाठी धाव घेतली. बोअरवेल, विहीरीवरील पंप सुरु करुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत वाहनांनी पेट घेतला होता.
ही आग निवासस्थाने व जवळच्या इतर ठिकाणी पोहोचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे लगतचे असलेली अर्बन बँकेची इमारत, किराणा मालाचे दुकान व साळवी यांच्या निवासस्थानापर्यंत आग पोहोचली नाही. मात्र अर्बन बँक व किराणा मालाचे शटर यांच्यासह वीजमीटरची हानी झालेली दिसली.
आगीचे कारण गुलदस्त्यात
मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीने अनेकांची झोप उडाली. अजित साळवी यांच्या निवासस्थानासह कार्यालये बचावली. मात्र मार्गताम्हानेत अशी घटना प्रथमच घडल्याने अनेकांमध्ये घबराट उडाली. आग नेमकी कशामुळे लागली अथवा लावली, गेली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सखोल तपासणी सुरु आहे.