सभापती राजेश पाटणेकर यांचा निवाडा : याचिका फेटाळण्य़ाची कारणे अद्याप स्पष्ट नाही: आमदार अपात्रता प्रकरण
प्रतिनिधी / पणजी
सभापतींसमोर अपात्रतेच्या टांगत्या तलावारीखाली असलेल्या 12 आमदारांनी मंगळवारी सुटकेचा निश्वास सोडला. ‘पिटीशन ईज डिसमीस’ असा फक्त एका ओळीचा निवाडा देऊन सभापती राजेश पाटणेकर यांनी सुदिन ढवळीकर आणि गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या दोन्ही याचिका फेटाळल्या. अजून पूर्ण निवाडा देण्यात आलेला नाही, या निवाडय़ाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले असून हा निवाडा अपेक्षित असल्याचे मत चोडणकर यांनी तर निवाडय़ामुळे निराशा झाल्याचे मत ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे.
निवाडा वाचनासाठी सभापती आपल्या चेंबरमध्ये होते तर याचिकादारांची व त्यांच्या वकिलांची व्यवस्था कॉन्स्फरन्स हॉलमध्ये व्हिडिओ कॉन्स्फरसींगद्वारे करण्यात आली होती. समोरील स्क्रीनवर फक्त सभापतीच दिसत होते. त्यांच्यासोबत चेंबरमध्ये आणखी कोण कोण होते का याची मुळीच कल्पना नसल्याचे सुनावणीवेळी हजर असलेल्या वकिलांनी सांगितले.
‘पिटिशन इज डिसमीस’ याचिका फेटाळण्यात येत आहे, असे एकच वाक्य बोलून सभापतींनी सुनावणी संपवली.
चुका दुरुस्त करुनच प्रत देणार : सभापती
निवाडा किती पानी आहे. त्याची प्रत कधी मिळणार, याची चौकशी याचिकादाराच्या वकिलांनी सभापतींकडे केली तेव्हा निवाडा लेखनात काही चूका असून शकतात. त्या दुरुस्त करुनच सुधारित प्रत दिली जाईल, असे उत्तर सभापतींनी दिल्याचे वकिलांनी सांगितले.
ही प्रत मिळण्यास किती काळ लागेल, असे सभापतींना विचारण्यात आले असता प्रत मिळवण्यासाठी आधी अर्ज करा. त्यानंतर योग्य मुदतीत प्रत दिली जाईल, असे सभापतींनी सांगितल्याची माहिती वकिलांनी दिली.
तांत्रिक की ठोस मुद्दा?
अपात्रता याचिका तांत्रिक मुद्यावरुन फेटाळावी असा युक्तिवाद प्रतिवादी आमदारांच्या वतीने मांडण्यात आला होता. सदर याचिका सादर करण्याचा अधिकार गिरीश चोडणकर यांना नाही, कारण ते विधानसभेचे आमदार म्हणजे सदस्य नाहीत. तसेच याचिका सादर करताना याचिकादाराने प्रत्यक्ष हजर राहून व्हेरिफिकेशन करावे लागते. सभापतींसमोरच हजर राहूनच सही करावी लागते. तसे न केल्यास तांत्रिक मुद्यावर याचिका फेटाळली जाऊ शकते. गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या याचिकेतील प्रतिज्ञापत्रावर सभापतींसमोर नव्हे तर एका नोटरीसमोर सही झाल्याने प्रतिवादी आमदारांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केला होता व याचिका सुनावणीस घेण्यापूर्वीच फेटाळण्याची विनंती सभापतींना केली होती.
सभापतींनी हा मुद्दा खुला ठेऊन मेरीटवर गुणवत्तेच्या आधारे ठोस मुद्दे ऐकुन घेतले होते. त्यामुळे याचिका तांत्रिकमुद्यावर की ठोस गुणवत्तेवर आधारुन फेटाळण्यात आली, हे पूर्ण निवाडय़ाची प्रत उघड झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
कारणे नंतर दिली जाऊ शकतात
निवाडय़ातील सारांश न वाचताही अंतिम निवाडा न्यायमूर्ती जाहीर करु शकतात व त्या निवाडय़ातील कारणे दाखवा किंवा विसृत निवाडा नंतर दिला जाऊ शकतो. निवाडा जेवढा मोठा असेल तेवढा वेळही लागू शकतो. सभापतींनी एका वाक्यात याचिका फेटाळल्या व पूर्ण निवाडा नंतर जाहीर करण्याचे सांगितले त्यात काही गैर नसून न्यायव्यवस्थेतही अशी प्रथा असल्याची माहिती वकिलांनी दिली.
दि. 22 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात
सभापती निवाडाच देत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर सभापतींना निवाडा देण्याचा आदेश द्यावा, ही मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर होती. आता सभापतींनी निवाडा दिलाच आहे. त्यामुळे गिरीश चोडणकर यांची याचिका कालबाह्य ठरुन निकालात काढली जाऊ शकते. सभापती निवाडय़ाची प्रत वादी प्रतिवाद्यांना कधी देतील ते दि. 22 एप्रिल रोजी होणाऱया सुनावणीवेळी विचारले जाऊ शकते.
निवाडा सभापतींचा नसून सुपर सीएमचा : गिरीश चोडणकर
सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेला निवाडा एकतर्फी असून तो अपेक्षितच होता. या निवाडय़ाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. हा निवाडा सभापतींचा नसून सूपर सीएमचा आहे. मुख्यमंत्री सुद्धा या सूपर सीएमच्या तालावर डोलतात, असा आरोप त्यांनी केला.
निवाडय़ाची प्रत मिळाल्यानंतर वकिल ठरवतील : सुदिन ढवळीकर
सभापतींनी अजून पूर्ण निवाडय़ाची प्रत दिलेली नाही, ती मिळाल्यानंतर त्या निवाडय़ाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की नाही हे आपले वकील ठरवतील व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कृती ठरवली जाईल, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. सभापतींनी दिलेल्या या निवाडय़ाची आपल्याला अपेक्षा नव्हती. त्यामुळे आपली घोर निराशा झाल्याचे ते म्हणाले.
सभापती राजेश पाटणेकर
निवाडा जाहीर झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रश्न मिटला आहे. निवाडा न वाचताच गिरीश चोडणकर यांनी न्यायमूर्तीवर असे आरोप करणे योग्य नव्हे. निवाडय़ावर टीका होऊ शकते पण निवाडा देणाऱया न्यायमूर्तीवर टीका केली जाऊ शकत नाही. सभापती या खटल्यात न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे गिरीश चोडणकर यांच्या विरुद्ध काय कारवाई करता येईल हे आपण ठरवणार असल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी जाहीर केले. निवाडा टंकलिखनासाठी आहे. त्यात काही त्रुटी राहिल्या असू शकतात. त्या सुधारल्यानंतर लगेच निवाडा जाहीर होईल, असे ते म्हणाले.