ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मात्र, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात भारतातून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट झाल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान भारतातून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट म्हणजेच 9301 मेट्रिक टन झाली आहे. त्यामधून सरकारने 8.9 कोटी रुपयांची कमाई केली. ही निर्यात अशा वेळी झाली जेव्हा देशातच ऑक्सिजनची कमतरता होती आणि कोरोना संक्रमित प्रकरणांच्या तुलनेत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. भारताने 2019-20 दरम्यान जवळपास 4514 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली होती.
जानेवारी 2020 मध्ये 352 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली. पण जानेवारी 2021 मध्ये ऑक्सिजनची निर्यात वाढून 734 मेट्रिक टन झाली. डिसेंबर 2020 मध्ये 2193 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली. दुसरीकडे डिसेंबर 2029 मध्ये 538 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली होती.
दरम्यान, ऑक्सिजनची निर्यात एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत दुप्पट झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.