प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यातील परिस्थिती सध्या हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसू लागली असून 24 रोजी एकाच दिवशी 54 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 272 वर पोहोचली आहे. काणकोण तालुक्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे.
बऱयाच ठिकाणी मास्क न वापरता फिरणे, सामाजिक अंतराचे बंधन न पाळणे आणि लग्नसराईच्या वेळी अनावश्यक गर्दी करण्याचा हा परिणाम असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सध्या काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात चिकित्सेसाठी गर्दी उसळत असून दिवसाला 100 लोकांची चाचणी केली जाते. एका बाजूला कोरोनाची चाचणी आणि दुसऱया बाजूला लसीकरण कार्यक्रमामुळे काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिकांवर ताण आलेला आहे.
त्यातच होवरे परिसर कंटेनमेंट विभाग म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे या भागाकडे 24 तास लक्ष द्यावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सरकारी यंत्रणा जेवढी सतर्क असायला हवी तेवढी अद्याप झालेली नाही. नुसती मास्क न वापरणाऱयांविरुद्ध कारवाई करून भागणार नसून रस्त्यावरील, बाजारातील आणि लग्नादी कार्यक्रमस्थळी होणारी गर्दी कशी कमी होईल याकडे लक्ष देण्याची मागणी या भागातून करण्यात येत आहे.