प्रतिनिधी/ खेड
लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री समर्थ इंजिनिअर्स कंपनीत 18 एप्रिल रोजी झालेल्या स्फोटातील जखमी ओंकार साळवी (22, खेर्डी-चिपळूण), आनंद जानकर (25, कासई-खेड) यांचा सांगली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या स्फोटातील मृताची संख्या 5 झाली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील अमित प्रकाश जोशी यांच्या मालकीच्या श्री समर्थ इंजिनिअर्स कारखान्यात रिऍक्टर प्लँन्टचे तापमान वाढून झालेल्या स्फोटात मंगेश जानकर, विलास कदम, सचिन तलवार या 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या स्फोटात परवेज आलम, ओंकार साळवी, आनंद जानकर, रामचंद्र बहुतुले, विश्वास शिंदे, जितेश आखाडे, विलास खरवते हे सात कामगार जखमी होते. यातील ओंकार साळवी, आनंद जानकर या दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.