ऑनलाईन टीम / चंदीगड :
महाराष्ट्रापाठोपाठ पंजाबमध्येही 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांचे उद्यापासून लसीकरण होणार नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, लसीची कमतरता असल्याने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण वेळेवर सुरू होणार नाही.
ते म्हणाले, केंद्राकडून आम्हांला लसींचा पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पंजाबला आता मुख्यमंत्री कोविड मदत निधीतून आणलेल्या 30 लाख लसींच्या आधारे ही मोहीम सुरू करावी लागणार आहे.
आरोग्यमंत्री बालबीर सिंह सिद्धू यांनी सांगितले की, सरकारने 1 मे पासून 18 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र, पंजाबमध्ये अजूनही लस उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्याची आता कोणतीही शक्यता नाही आहे.
पुढे ते म्हणाले, पंजाब सरकारने सिरमकडे 30 लाख लसींचा ऑर्डर दिली आहे. मात्र, अजून तरी आमच्याकडे लस उपलब्ध झाली नाही. बुधवारी आम्हांला 2 लाख लसी उपलब्ध झाल्या होत्या. तर त्यापूर्वी दीड लाख लस मिळाल्या होत्या. पण आज आणि उद्या आम्हांला किती लस उपलब्ध होतील याबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही. जर आम्हांला कमीत कमी 2 लाख लस उपलब्ध झाल्या तर आम्हाला ही मोहीम सुरू करता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.