रविवारी 37,733 नवे रुग्ण : 21 हजारहून अधिक कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यात 37,733 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 21,149 जण संसर्गमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 217 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 16,01,865 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी एकूण 11,64,398 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 16,011 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. राज्यात अजूनही विविध इस्पितळे, होम केअरमध्ये 4,21436 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 1,58,365 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेने पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण रविवारी 23.82 इतके होते. तर मृत्यूचे प्रमाण 0.57 टक्के आहे. राज्यात रुग्ण संसर्गमुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
बेंगळूर शहर जिल्हय़ात सर्वाधिक 21,199 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बळ्ळारी जिल्हय़ात 1,156, म्हैसूरमध्ये 2,750, तुमकूरमध्ये 1,302, मंगळूरमध्ये 996, बागलकोट 691, बेळगाव 372, बेंगळूर ग्रामीण 286, बिदर 584, चामराजनगर 271, चिक्कबळ्ळापूर 446, चिक्कमंगळूर 166, चित्रदुर्ग 152, दावणगेरे 317, धारवाड 714, गदग 118, हासन 792, हावेरी 157, गुलबर्गा 427, कोडगू 246, कोलार 282, कोप्पळ 567, मंडय़ा 653, रायचूर 445, रामनगर 441, शिमोगा 620, उडुपी 413, कारवार 538, विजापूर 303 आणि यादगीर जिल्हय़ात 302 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची भीती
राज्यात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न चालविलेले असतानाच राज्यात ऑक्टोबरपासून कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती कोविड तांत्रिक सल्लागार समितीतील तज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात दररोज 40 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असतानाच आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कर्नाटकात मे ते जुलै महिन्यापर्यंत कोरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होणार आहे. त्यानंतर ही लाट हळूहळू ओसरेल. जर राज्यातील लोकांनी स्वयंनिर्बंध घालून न घेता सुरक्षा मार्गसूचींच्या पालनाकडे दुर्लक्ष केल्यास ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे.