मुलगा गंभीर जखमी, धोकादायक वळणावर अपघात
प्रतिनिधी/ काणकोण
आगोंद येथून काणकोणला येत असताना एका धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात आगोंद येथील निवृत्त शिक्षक महाबळेश्वर फळदेसाई (वय 75 वर्षे) जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा संकेत फळदेसाई गंभीर जखमी झाला आहे.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या वॅगनार वाहनाने चावडीवर येत असताना आगोंद येथील सदर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा गेल्याने हा अपघात झाला. या अपघातात महाबळेश्वर फळदेसाई वाहनात चिरडल्यामुळे त्यांना मृत्यू आला. अपघाताची खबर मिळताच काणकोणचे पोलीस पथक, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून गेले आणि जखमी व्यक्तीला त्वरित रुग्णवाहिकेच्या साहाय्याने काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काणकोणचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास पुढील तपास करत आहेत.
मयत फळदेसाई यांच्यापश्चात पत्नी, संकेत व अभय हे विवाहित मुलगे, विवाहित कन्या, जावई, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. सरकारी प्राथमिक शिक्षक म्हणून जवळजवळ 40 वर्षे सेवा दिल्यानंतर दहा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आणि नेहमीच सहकार्यासाठी धावून येणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते. आगोंदचे माजी सरपंच प्रमोद फळदेसाई यांचे ते चुलते होत. ज्या ठिकाणी हा जीवघेणा अपघात घडला त्या ठिकाणी यापूर्वी देखील कित्येक अपघात घडलेले असून या अपघातप्रवण अशा जागेवर दिशानिर्देशक फलक लावण्याची मागणी आपण वारंवार करत आलेलो आहे, अशी प्रतिक्रिया प्रमोद फळदेसाई यांनी व्यक्त केली.