प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची लागण होऊन ऑक्सिजनअभावी मृतांची संख्या वाढली आहे. दररोज असंख्य मृत्यू होत असल्याने शववाहिकेची अडचण भासत आहे. त्यामुळे महापालिकेने जिल्हा रुग्णालयात मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या ठिकाणी शववाहिका उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकाऱयांनी दिली आहे.
जिल्हा व खासगी रुग्णालयात मृतांचा आकडा वाढला आहे. अशा स्थितीत शववाहिका मिळणे कठीण झाले आहे. काही शववाहिका चालक मोठय़ा प्रमाणात रक्कम घेत आहेत. तसेच काही गावांना जाण्यास शववाहिका चालक टाळाटाळ करीत आहेत. सध्या मनपाच्या शववाहिका सतत कार्यरत आहेत. त्यामुळे शहरवासियांना शववाहिका मिळणे कठीण बनले आहे. परिणामी खासगी शववाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या शहरातील परिस्थितीचा विचार करून सेवाभावी संघटनांनी शववाहिका उपलब्ध केल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण पाहता शहरातील नागरिकांना रुग्णवाहिकेची अडचण भासत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही रुग्णवाहिका व शववाहिका चालक नागरिकांना लूटत आहेत. त्यामुळे मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
यापूर्वी कोरोना मृतदेहावर शहरातच अंत्यविधी होत होता. पण सध्या शहरातील स्मशानभूमी अंत्यविधीकरिता अपुऱया पडत आहेत. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या हाती सोपविण्यात येत आहेत. पण मृतदेह नेण्याकरिता शववाहिकांची अडचण भासत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने जिल्हा रुग्णालय आवारात मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.