प्रतिनिधी / लातूर
लातूर शहरात म्युकर मायकोसिसचे रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या सर्व रूग्णावर विशेष लक्ष दिले जात असून अशा प्रकारच्या रूग्णावर नेमकी कोणती, किती औषधे मागवायची यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शासकीय व खासगी रूग्णालयांना देखील अशा प्रकारच्या रूग्णांची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेच याबाबतची माहिती दिली आहे.
म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशी कोरोनानंतर आता या नवीन आजाराचे रूग्ण राज्यभर आढळून येत आहेत. या आजारात डोळ्याला इजा होत असल्याचे सांगितले जाते. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काळ्या बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या ७ रूग्णांवर उपचार चालू आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील खासगी रूग्णालयाने या संदर्भातील माहिती आरोग्य विभागाला कळविली नाही. जिल्ह्यामध्ये अशा आजाराचे नेमके किती रूग्ण आहेत. त्यानुसार शासनाकडे औषधांची मागणी करणे सोपे होईल. त्या अनुषंगाने आवाहन करण्यात आले आहे.
म्युकर मायकोसिस आजारावरील औषध महागडे असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १ हजार रूग्णालयामध्ये या आजाराच्या रूग्णावर मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीन दिवसापुर्वीच जाहीर केले आहे. ज्या कोरोना रूग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रीत नाही. त्यांच्यामध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या आजारावर लवकर उपचार केला नाही तर श्वसन, मेंदू, डोळ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे तज्ञ सांगत आहेत.
अशा प्रकारच्या आजारामुळे रूग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणार्यांनी तो नियंत्रीत ठेवावा, त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टराच्या सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा, असेही तज्ञ सांगत आहेत.