जीवितहानीचे वृत्त नाही ः बिहारमध्ये दिसून आला प्रभाव
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये बुधवारी सकाळी 5.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. नेपाळच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे सुमारे 5 वाजून 42 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र पोखरापासून 35 किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवितनहानीचे वृत्त अद्याप प्राप्त झालेले नाही.
नेपाळच्या लामजुंग जिल्हय़ातील पोखरानजीक या भूकंपाचे केंद्र होते. हे क्षेत्र नेपाळच्या चीनला लागून असलेल्या सीमेनजीक आहे. हिमालयातील हा भाग भूकंपाच्या दृष्टय़ा अत्यंत संवेदनशील आहे.
भूकंपाचे केंद्र बिहारपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. याचमुळे भूकंपाचा प्रभाव बिहारच्या उत्तर सीमेवर दिसून आला आहे. पण अद्याप कुठल्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. यापूर्वी मागील महिन्यात आसामच्या सोनिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी होती. आसाममध्ये अर्ध्या तासात भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते. त्यावेळीही भूकंपाचे धक्के बंगाल आणि बिहारमध्ये जाणवले होते. त्यावेळीही सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.